पुण्यात बनावट इंजेक्शन औषध रॅकेटचा पर्दाफाश; पाच कंपन्यांवर गुन्हा
पुणे : पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बनावट इंजेक्शन औषध विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी पाच कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अँबुल्युरेल’ या इंजेक्शन औषधाच्या नावाखाली बनावट औषध बाजारात विकले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या इंजेक्शनमध्ये कोणतेही सक्रिय औषधी घटक नसल्याचे नमुना तपासणीत आढळून आल्याने रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे.
या प्रकरणात मैत्री फार्मा (सदाशिव पेठ, पुणे), श्री साई लॉजिस्टिक्स, लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड, NRX डिस्ट्रिब्युटर्स LLP आणि RRT फार्मा या पाच कंपन्यांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे बनावट इंजेक्शन औषध बाजारात विक्रीस आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. नमुने तपासणीदरम्यान फसवणुकीची खात्री झाल्यानंतर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सध्या बनावट साठ्याचा मूळ स्रोत शोधण्यावर केंद्रित करण्यात आला आहे. हे औषध स्थानिक पातळीवर तयार करण्यात आले होते की बाहेरून आणण्यात आले होते याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकारच्या बनावट औषधांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी कठोर तपासणी आणि कारवाईची आवश्यकता असल्याचे मतही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे.


