ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

0
74
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

लातूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार आणि पुरोगामी विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य आणि समाजकारण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

शरद पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, लातूर नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून डॉ. वाघमारे यांची कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय राहिली. तसेच त्यांची संसदीय कारकीर्दही कौतुकास्पद होती. पुरोगामी विचारांवर त्यांची भक्कम पकड होती. शिक्षण, कृषि, साहित्य, कला, राजकारण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा मुक्त वावर होता.

या विविध क्षेत्रांवरील अनुभवाच्या आधारे त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली आणि समाजप्रबोधनाचे कार्य केले. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक परदेश दौरे करत नवीन संकल्पना आत्मसात केल्या आणि त्या शिक्षण व्यवस्थेत रुजविण्याचा प्रयत्न केला.

डॉ. वाघमारे यांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक कुलगुरू तसेच लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’चे ते शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तसेच मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह २०२५ चे मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांच्या निधनामुळे वाघमारे कुटुंबियांसह संपूर्ण समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना सर्व स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here