प्लास्टिकला पर्याय म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन
मुंबई l प्रतिनिधी
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली. बांबू उत्पादन, त्याची प्रक्रिया आणि बाजारपेठ निर्मिती यांना चालना देऊन ग्रामीण तसेच आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेतील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले की, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ साधन म्हणून बांबूचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकच्या वस्तूंमुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता बांबू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे राज्यात बांबू लागवडीचा विस्तार करण्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये शेतकरी आणि आदिवासी बांधवांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. बांबू उत्पादनासाठी आवश्यक मार्गदर्शन, तांत्रिक मदत तसेच प्रशिक्षण देऊन त्यांना या क्षेत्रात सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे .
बांबूवर आधारित उद्योगांना चालना मिळावी यासाठी प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा विचारही शासनाच्या स्तरावर सुरू आहे. या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मंत्री नाईक यांनी व्यक्त केला.
यासोबतच शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या बांबूच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेत स्थान मिळावे यासाठी मॉल आणि व्यापारी संकुलांमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे बांबू उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळून उत्पादकांना आर्थिक लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
पर्यावरण संरक्षणा सोबतच ग्रामीण विकास आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही उद्दिष्टांचा विचार करून बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री नाईक यांनी यावेळी नमूद केले.


