सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी “लवकर या, लवकर जा” योजना जाहीर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुंबई l प्रतिनिधी
काम आणि कुटुंब यामधील समतोल साधता यावा यासाठी राज्य सरकारने सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी “लवकर या, लवकर जा” ही योजना जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ही घोषणा केली.
या योजनेनुसार सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत सुमारे ३० मिनिटांची लवचिकता देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला कर्मचारी सकाळी थोडे लवकर कार्यालयात येऊन त्यानुसार सायंकाळी लवकर घरी जाऊ शकतील. विशेषतः मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रवासाची गर्दी आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सरकारच्या मते या उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि कामाचे वातावरण अधिक अनुकूल बनेल. तसेच महिलांना कुटुंब, मुलांची जबाबदारी आणि नोकरी यांचा समतोल साधणे अधिक सोपे होईल.
दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारकडून आणखी काही उपाययोजना करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.


