संकटकाळी माणुसकीचाच देव धावून येतो
मुंबई l प्रतिनिधी
बिहारकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये नगेंद्र कुमार यांच्या पत्नी ममता कुमारी यांना अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. रेल्वे स्थानकात डॉक्टर किंवा वैद्यकीय साधने नसल्याने परिस्थिती गंभीर बनली.
मुंबईहून पुढे जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन कसारा स्थानकावर इंजिन बदलण्यासाठी थांबणार होती. दांपत्याने देवाकडे साकडे घालत कसारा गाठू दे, अशी प्रार्थना केली. ट्रेन कसारा पोहोचताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेतला. काळूबाई चंद्रकांत लहाने आणि सरला खंडू भानगीर यांनी धाडस दाखवून सुरुवातीची मदत केली. याचवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथील नर्स सोनाली सागर सांगळे यांना सूचना मिळाली.
सोनालीताई ताबडतोब स्टेशनवर धावत पोहोचल्या. वैद्यकीय साधनां अभावीही त्यांनी धैर्य आणि कौशल्याने प्रसूती पूर्ण केली. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित! नंतर अम्ब्युलन्स चालक सतीश खरे, शोभा सोनवणे, जी.आर.पी. एफ. शिपाई विष्णू आसाराम सुपेकर आणि सरपंच प्रकाश वीर यांनी ममता कुमारींना आरोग्य केंद्रात दाखल केले.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या मोहिमेत स्टेशन मास्तर रोहित उबाळे आणि RPF वरिष्ठ पीआय सचिन मोरे यांनीही कर्तव्यनिष्ठेने योगदान दिले.
कसारा स्टेशनवर घडलेली ही घटना सांगते की संकटात माणुसकी एकत्र येत असते. धाडस, कर्तव्य आणि माणुसकीमुळे एक नवजीवनाचा जन्म झाला, आणि पुन्हा सिद्ध झाले: माणुसकी हाच खरा धर्म.


