कर्नाटक राज्य अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांची
सिंधुदुर्गनगरी l प्रतिनिधी
समग्र शिक्षा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अविष्कार अभियान 2025-26 या उपक्रमाअंतर्गत राज्याबाहेरील अभ्यास सहलीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीतील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
समग्र शिक्षा अभियानातील Exposure Visits Outside the State या उपक्रमांतर्गत ज्या शाळांची शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) उत्कृष्ट आहे, अशा शाळा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच औद्योगिक क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी औद्योगिक संस्थांना भेट देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने बेळगाव येथील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड तसेच Atlas कंपनी येथे विद्यार्थ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांनी दिली.
या अभ्यास सहलीसाठी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीतील २२ मुलगे व २३ मुली असे एकूण ४५ गुणवंत विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. ही सहल दि. १० मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीत कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे.
सहलीचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे
पहिला दिवस :
सिंधुदुर्गनगरी ते बेळगाव असा एस.टी. बसने प्रवास करून उद्यमबाग औद्योगिक क्षेत्राला भेट दिली जाईल. त्यानंतर रात्री १० वाजताच्या रेल्वेने बेळगावहून बेंगळुरूकडे प्रस्थान होईल.
दुसरा दिवस :
बेंगळुरू येथे लालबाग बॉटनिकल गार्डन, इस्रो सेंटर, हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड (HAL) तसेच विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँ
पान ३ वरून
इस्रो सेंटर, हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड (HAL) तसेच विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नोलॉजिकल म्युझियम यांना भेट दिली जाईल.
तिसरा दिवस :
बानेरघट्टा प्राणी संग्रहालय आणि कब्बन पार्क येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना नैसर्गिक व वैज्ञानिक वारशाची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल.
चौथा दिवस :
बेंगळुरूहून बेळगावमार्गे सिंधुदुर्गनगरीकडे परतीचा प्रवास होईल.
या अभ्यास सहलीमुळे विद्यार्थ्यांना इतर राज्यातील शैक्षणिक व औद्योगिक प्रगतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार असून विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक समृद्धी आणि आनंददायी शिक्षणाला चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानातही लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.
या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत महेश पालव (उपशिक्षक, जि.प. शाळा सावंतवाडी क्र.४), महेश नाईक (उपशिक्षक, जि.प. शाळा बोर्डवे), स्नेहलता राणे (उपशिक्षिका, जि.प. शाळा सांगुळवाडी), दिपाली सावंत (उपशिक्षिका, जि.प. शाळा माणगाव क्र.२) तसेच स्मिता नलावडे (जिल्हा समन्वयक – नियोजन व नियंत्रण) हे जिल्हा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. विविध शैक्षणिक व संशोधन संस्थांना भेट देताना विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या संधींची ओळख होऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे. या उपक्रमाचे जिल्ह्यातील शिक्षक व पालकांकडूनही स्वागत करण्यात येत आहे.


