नवी मुंबईत महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धा
नवी मुंबई l प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दि. २३ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ४० वर्षांवरील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून महापौर यांच्या पदनामाने विविध
क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात. या माध्यमातून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे. त्याच अनुषंगाने यंदाही 40+ वयोगटातील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत नवी मुंबईतील ३० गावांतील ३३ संघ, तसेच शहरी विभागातील २५ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्पर्धेतील सामने दि. २३ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून ते २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महानगरपालिका मुख्यालयाजवळील मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार असून, वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील संघांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईतील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती गिरीश म्हात्रे यांनी केले आहे.


