
कसालचा मेघराज कसालकर जर्मनीत झळकला; विद्यापीठाचा ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून गौरव
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने मेघराज कसालकर यांनी यूट्यूबवर शैक्षणिक चॅनेल सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. जर्मन भाषेवरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीची दखल घेत जर्मनीतील विद्यापीठाने त्यांची ‘ब्रँड अॅम्बॅसिडर’ म्हणून नियुक्ती केली आहे.
तसेच जर्मनीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांमध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करत संबंधित संस्थांकडून त्यांचा ‘रोल मॉडेल’ म्हणून सन्मान करण्यात आला आहे.
दरम्यान, आसाम सरकार शिक्षण क्षेत्रात व्यापक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने परदेशी शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीला भेट दिलेल्या आसाम सरकारच्या शिष्टमंडळात मेघराज कसालकर यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत आसाम सरकारने गुहावटी येथे २९ ते ३१ जानेवारीदरम्यान होणाऱ्या शिक्षण परिषदेसाठी त्यांना विशेष निमंत्रण दिले आहे.
उच्च शिक्षणाच्या माध्यमातून देशासाठी योगदान देण्याचा ध्यास घेतलेल्या मेघराज कसालकर यांच्या कार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

