कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी): भारतीय लोकशाहीला दिशा देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि वंचित, शोषित व पीडित समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दि. १४ एप्रिल २०२६ रोजी गोपुरी आश्रम, कणकवली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था उभारण्याचा संदेश देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधाननिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी, समाजवादी, संविधानवादी, लोकशाहीवादी तसेच विज्ञाननिष्ठ विचारांचे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी गोपुरी आश्रमचे व्यवस्थापक विनायक (बाळू) मेसी, अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, ज्येष्ठ सेवा दल साथी कलमताई परुळेकर, नितीन वाळके (मालवण), सुहास ठाकूर देसाई, संजय वेतुरेकर (कुडाळ), विजयालक्ष्मी चिंडक, मुर्ती कासार (सावंतवाडी), सहदेव पाटकर, अॅड. प्रविण नाईक (अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल सिंधुदुर्ग), डॉ. सुभाष सावंत (सचिव), भाई परमेकर, सुचन कोरगांवकर तसेच प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे आदी मान्यवरांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


