‘शिक्षकांचे मानसिक आरोग्य’ विषयावर २५ एप्रिलला कार्यशाळा; तज्ज्ञ मार्गदर्शनाचा लाभ
मुंबई : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षकांचे मानसिक आरोग्य” या महत्त्वपूर्ण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित केली आहे.
अलिकडच्या काळात शिक्षकांमध्ये वाढलेले मानसिक दडपण, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड आणि प्रशासकीय कामांचा ताण या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. बीएलओ, जनगणना यांसारख्या अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि ऐनवेळी येणारी परिपत्रके यामुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर मार्गदर्शन करणार असून दोन कृतीयुक्त संवाद सत्रांद्वारे शिक्षकांना तणाव व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विशेष सल्लागार बसंती रॉय आणि पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ही कार्यशाळा मुंबई महानगर व परिसरातील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी खुली असून विद्याभवन संकुल घाटकोपर येथे प्रत्यक्ष आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळा विनामूल्य असली तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
अधिकाधिक शिक्षकांनी सहभागी होऊन मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


