ओझर विद्या मंदिर, कांदळगावचा जिल्हा परीक्षेत दैदिप्यमान यश
मसुरे (प्रतिनिधी) : DCA Association आयोजित जिल्हास्तरीय परीक्षेत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित Ojhar Vidya Mandir Kandalgav या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इयत्ता सहावीच्या परीक्षेत कुमारी स्मृती उदय परब हिने २०० पैकी १५६ गुण मिळवत जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला असून तिला गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे कुमार योगेश यशवंत आयकर आणि कुमारी आस्था सुरेंद्र बागवे यांनी प्रत्येकी २०० पैकी १२८ गुण मिळवत जिल्ह्यात संयुक्त अठरावा क्रमांक मिळवून सिल्वर मेडल मिळवले.
इयत्ता सातवीच्या परीक्षेत कुमारी चिन्मयी राजेंद्र पारकर आणि कुमार कृष्णा राजन मेस्त्री यांनी ब्रॉन्झ पदक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती, शालेय समिती, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माता-पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ तसेच ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.


