अणाव दाबाची वाडी तलाव परिसरातील उद्यानाचे लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला असून अणाव दाबाची वाडी तलाव शेजारी विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण पार पडले.
या प्रकल्पासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री Nitesh Rane यांनी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना (पर्यटन) अंतर्गत सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी आतापर्यंत ९८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या विकासकामाचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार Nilesh Rane, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरीच्या काठावर असलेल्या तलाव परिसराच्या सुशोभीकरणामुळे हा भाग पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. उद्यानामध्ये आधुनिक भौतिक सुविधा, सुरक्षित आणि आकर्षक पदपथ, तसेच विविध प्रकारच्या वृक्षलागवडीद्वारे हरित आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे Sindhudurg जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनाला नवी चालना मिळणार असून स्थानिक नागरिकांसाठीही हा परिसर विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण ठरणार आहे.


