पनवेलमध्ये ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन केंद्र’ प्रकल्पाची तयारी; नितेश राणेंचे निर्देश
पनवेल : पनवेल येथील मत्स्य उपकेंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प उभारण्यासाठी सर्वंकष अभ्यास करून नियोजन करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रस्तावानुसार मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारा जागतिक दर्जाचा प्रकल्प उभारण्यावर भर देत सखोल अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
पनवेल येथील Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth अंतर्गत असलेले मत्स्य उपकेंद्र समुद्रमुखाजवळ असून सागरी व गोड्या पाण्यातील जैवविविधतेसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे सुमारे १० एकर क्षेत्रावर अॅक्वेरियम, विविध सागरी जीवसृष्टी प्रदर्शन आणि ‘सी लायन शो’सारखे आकर्षण उभारण्याचा प्रस्ताव आहे.
बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्यउद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


