डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवाजी पार्कवर भव्य ड्रोन शो; आकाशातून महामानवांना अनोखे अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रथमच भव्य ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी पार्क येथे करण्यात आले. या नेत्रदीपक कार्यक्रमाने उपस्थित नागरिकांची मने जिंकली.

सुमारे २,००० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात साकारण्यात आलेल्या प्रकाशचित्रांमधून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे, भारतीय संविधानाची निर्मिती आणि सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महामानवांना वाहण्यात आलेले हे अनोखे अभिवादन उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले.
कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बाबासाहेबांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. “वाचनाची सवय जोपासून बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य झाला,” असे ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही संविधानामुळे समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. “ड्रोन शोसारख्या अभिनव उपक्रमांतून नव्या पिढीपर्यंत बाबासाहेबांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी डॉ. आंबेडकरांचे दया, समानता, सामाजिक जबाबदारी आणि न्याय यांवर आधारित विचार आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे सांगितले. भारतीय संविधान हे जगासाठी मार्गदर्शक असून, त्यावर उभारलेली लोकशाही व्यवस्था समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला आमदार अमित साटम, योगेश सागर, प्रसाद लाड, महापौर रितू तावडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


