स्त्री मुक्ती संघटना पंधरा वर्षे समुपदेशन यश, आम्हाला थांबणं परवडणारं नाही – योगिनी राऊळ.
स्त्री मुक्ती संघटना, मुंबई गेली पन्नास वर्षे स्त्रियांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात काम करते. घरगुती हिंसाचार, शिक्षणातली गळती, लैंगिक अत्याचाराची वाढती प्रकरणं हे स्त्रियांचे थेट दिसणारे प्रश्न.
पण त्याच बरोबरीने इतरही अनेक समस्यांना स्त्रिया रोजच्या जगण्यात तोंड देत असतात.मुंबई-ठाणे-नवी मुंबई अशा वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये सतत वाढणारा कचरा हा शासन-प्रशासनासाठी जिकिरीचा प्रश्न आहे. मात्र स्त्री संघटनांसाठी त्यात महत्त्वाचं काय आहे तर या कचरावेचक बायांचं हलाखीचं जीणं आणि त्यांचं या शहराच्या खिजगणतीतही नसणं.
महानगरपालिकांच्या गटारखात्यात, झाडूखात्यात कायम वा कंत्राटी पध्दतीने सफाई करणारे हे सगळे १०० टक्के दलित समाजाचे लोक. घरोघरी जाऊन सुका व ओला कचरा गोळा करून, त्याचं वर्गीकरण करणाऱ्या या दलित स्त्रिया अनेक अंगांनी पिडीत – घरच्या पुरुषांची घातक व्यसनं, कचरा वेचताना होणाऱ्या जखमा /जंतुसंसर्ग, दुष्काळी प्रदेशातून शहरात झालेलं विस्थापन, मुलांच्या शिक्षणाची आबाळ आणि पाचवीला पुजलेली गरीबी, मारहाण, फसवणूक….. सगळंच. शहरात असूनही शहरीकरण स्वतःत मुरवू न शकलेल्या या बाया.
यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्त्री मुक्ती संघटनेने शहरी परिसर विकासाच्या उद्देशाने त्यांना एकत्र केलं, परिसर भगिनी असा मान दिला, त्यांच्या मुला-मुलींनी पुन्हा कचऱ्याच्या जगात प्रवेश करू नये म्हणून शिष्यवृत्ती योजना आखल्या, वस्तीपातळीवर खेळवाड्या चालवल्या, कम्युनिटी लर्निंगचे प्रयत्न केले, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर कचरावेचकांच्या संघटनांमध्ये त्यांनी घेतलेली झेप पाहिली.
यातलीच एक नवी झेप – दहावीची परीक्षा देणं. याचं श्रेय जितकं स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांना जातं, तितकंच शिवराज वायचळ यांच्या गेल्या वर्षी आलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाला.
मुंबई महानगरपालिकेतल्या सफाईखात्यातल्या, पाणीखात्यातल्या कामगारांच्या दहावी पास होण्याच्या जिद्दीची खरी कहाणी या सिनेमाने लोकांसमोर आणली. आमच्या परिसर भगिनींनी एकत्रितपणे हा सिनेमा पाहिला आणि अकरा जणींनी जूनमध्ये दहावीचा अभ्यास सुरू केला. मग रीतसर परीक्षेचा बाहेरून फॉर्म भरणं, अभ्यासासाठी प्रोत्साहन, जागा आणि मुख्यतः वेळ उपलब्ध करून देणं, हा हातभार संघटनेनं लावला. या सर्वजणी पहिल्याच प्रयत्नात दहावी पास झाल्या, हा आनंद तुमच्या सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी या पोस्टचा प्रपंच. या अकरा मैत्रिणींचं अभिनंदन.
आनंदी कांबळे 65.20%
प्रतीक्षा कीरतकुढवे 62.00%
चंदा पटेकर 58.20%
सोनाली कांबळे 54.40%
मंगल कांबळे. 51.40%
सुनंदा पाठनुरे 50.40%
अक्षदा गायकवाड. 50.20%
हेमा कांबळे 44.80%
मुक्ता राठोड 39.40%
रमा बगाडे 38.20%
संगीता आसवले 37.20%
परिसर विकासाबरोबरच कुमारवयीन मुलांसाठी स्त्री मुक्ती संघटना ‘जिज्ञासा’ प्रकल्प चालवते. जवळजवळ तीस वर्षांपूर्वी जेव्हा शालेय समुपदेशन ही संकल्पना मांडली गेली तेव्हा शाळेच्या प्रशासनाकडून ‘हे काय नवीन खूळ आता यांचं?’ असाच बहुतांशी अनुभव आला. पण पुढेपुढे ही संकल्पना बऱ्यापैकी रुजली. फलस्वरूप, आज अनेक शाळांमध्ये पूर्णवेळ समुपदेशक आहेत.
पुण्यातील दहा शाळांमध्ये स्त्री मुक्ती संघटना गेली बारा – पंधरा वर्षे समुपदेशन करते, जिज्ञासाची सत्र घेते. या सर्व शाळांचा दहावीचा निकाल ८० टक्क्यांच्या वर लागला आहे आणि तिथल्या मुख्याध्यापकांनी संघटनेचे विशेष आभार मानले आहेत.
1. डॉ. वसंतदादा पाटील विद्यालय -१००%
2. हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय- ९१.०३%
3. डॉ. दादा गुजर मा. विद्यालय -९८%
4. माहात्मा फुले मा. विद्यालय – ८३.३३%
5. संत नामदेव मा. विद्यालय -८४.२८%
6. नंदादीप मा. विद्यालय समजने बाकी
7. सावित्रीबाई फुले मा. विद्यालय – ९६.५%
8. रफी अहमद किडवाई विद्यालय -९३.७५%
9. हिरामण बनकर मा. विद्यालय – ९२%
10. अरण्येश्वर मा. विद्यालय – ८६.६६%
ज्या मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं होतं, त्यांच्या अभ्यासात, प्रगतीत संघटनेच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे, अशी पावती खुद्द या शाळांनी आम्हाला दिली आहे. सातत्याने मुलांशी संपर्कात राहिल्यामुळे मुलांच्या मनात शिक्षकांइतकाच विश्वास समुपदेशकांबद्दलही निर्माण झाला, त्याचा हा परिणाम आहे.
तर असं हे मीच माझ्या संघटनेचं केलेलं जाहीर अभिनंदन! स्त्री मुक्तीच्या संकल्पनेला अनेक आयाम आहेत, त्यांना भिडण्याचा प्रयत्न आम्ही गेली पन्नास वर्षे करत आहोत. तुमची सर्वांची साथ आणि योग्य समजूत याची गरज नेहमीच असेल.
झिंदाबाद साथियों.
– योगिनी राऊळ


