
काजू उद्योगातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना; GI मानांकनासह सर्वसमावेशक योजनेवर भर
सिंधुदुर्ग : काजू उद्योगासमोरील अनियमित पुरवठा, बाजारपेठेतील अडचणी तसेच GI मानांकनासंदर्भातील विविध प्रश्नांवर सर्वसमावेशक योजना तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या वतीने स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे संचालक मनीष दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीची पहिली बैठक शुक्रवार, ८ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग बँकेच्या सभागृहात पार पडली. बैठकीत काजू उत्पादन, प्रक्रिया उद्योग, शेतकरी हित, निर्यात संधी तसेच सिंधुदुर्ग काजूला GI मानांकन मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
समिती सचिव तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, व्यवस्थापक विनायक कोकरे, समिती सदस्य डॉ. परशुराम पाटील, यादव, रुपेश बेलोसे, सहाय्यक उपसरव्यवस्थापक महेंद्र पवार, बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, प्र. जिल्हा उपनिबंधक सुनील मरबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. क्षीरसागर तसेच शेतकरी आणि प्रक्रियादार प्रतिनिधी उपस्थित होते.
अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्गातील काजू उद्योगाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी देण्यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

