महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर विधानभवनात आढावा बैठक
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधानभवन येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली.
यावेळी पुनर्वसन प्रक्रिया राबविताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत रहिवाशांच्या पुनर्वसन, मोबदला, फ्लॅट वाटप तसेच सर्वेक्षण प्रक्रियेसंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. रहिवाशांच्या अडचणी समजून घेत त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.
तसेच महात्मा फुले स्मारक परिसरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


