एच. डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा
अनुज चौधरीची नाबाद शतकी खेळी; वेंगसरकर संघ २४५
कार्तिक छाजेरच्या नाबाद ९५ ; शास्त्री संघ ४ बाद २५८
मुंबई, २१ मे :
मुंबईचा १४ वर्षाखालील खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या आणि अंतिम साखळी लढतीत वेंगसरकर संघाने अनुज चौधरीच्या (नाबाद ११५) नाबाद शतकी खेळीमुळे सर्वबाद २४५ धावांचे लक्ष्य उभारले. कर्नाटक सपोर्टींग येथील या लढतीत प्रतिस्पर्धी तेंडुलकर संघाने पहिल्या दिवसाखेर १ बाद ७१ धावा असे चोख प्रत्युत्तर दिले आहे. ओव्हल मैदान येथील लढतीत शास्त्री संघाने देखील कार्तिक छाजेर याच्या नाबाद ९५ धावांच्या खेळीमुळे ४ बाद २५८ अशी दमदार मजल मारली आहे.
कर्नाटक सपोर्टींगवर वेंगसरकर संघाच्या ४ बाद ६४ धावा अशा अडखळत्या सुरुवातीनंतर आर्शियान शेख (५३) आणि अनुज चौधरी (नाबाद ११५) यांची जोडी जमली आणि त्यांनी पाचव्या विकेटसाठी १०५ धावांची भागी रचली. अनुजने तीन सामन्यात हे दुसरे शतक नोंदविताना ९९ चेंडूत १९ चौकार आणि एक षटकार ठोकला. मात्र अन्य फलंदाजांची योग्य साथ न लाभल्याने त्यांचा डाव २४५ धावांवर मर्यादित राहिला. तेंडुलकर संघाच्या शौनक गावडे याने ६८ धावांत ४ तर कर्णधार आरव यादवने ५१ धावांत ३ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना तेंडुलकर संघाने २२ षटकांत १ बाद ७१ असे चोख उत्तर दिले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नीयांश मारू (खेळत आहे २८) आणि आरव यादव (खेळत आहे ३१) ही जोडी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करून अभेद्य होती.
ओव्हल येथील दुसऱ्या लढतीत गावस्कर संघाने शास्त्री संघाला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर त्यांनी ४ बाद २५८ अशी दमदार मजल मारली आहे. श्रेयस लाटे (३८) आणि दक्ष बिष्णोई (३१) यांनी ७३ धावांची सलामी दिली तर अर्णव शेलार (१८) आणि देवांग कोळी (५५) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३४ आणि कोळी आणि कार्तिक छाजेर (खेळात आहे ९४) यांनी चौथ्या विकेटसाठी १२० धावांची भागी रचल्याने त्याने अडीचशे धावांची मजल मारता आली. कार्तिकने ९० चेंडूंतच १६ चौकारांसह ९५ धावा केल्या आहेत. गावस्कर संघासाठी ईशान विचारे याने ३३ धावांत २ बळी मिळविले. उद्या या अंतिम साखळी लढतीचा शेवटचा दिवस असून त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होईल.
संक्षिप्त धावफलक – कर्नाटक सपोर्टींग (क्रॉस मैदान)- वेंगसरकर संघ – ५३.५ षटकांत सर्वबाद २४५ (अंकित म्हात्रे ३०, आर्शियान शेख ५३, अनुज चौधरी नाबाद ११५; शौनक गावडे ६८ धावांत ४ बळी, आरव यादव ५१ धावांत ३ बळी) वि. तेंडुलकर संघ २२ षटकांत १ बाद ७१ (नीयांश मारू खेळत आहे २८, आरव यादव खेळत आहे ३१)
ओव्हल मैदान – शास्त्री संघ – ९२ षटकांत ४ बाद २५८ (श्रेयस लाटे ३८, दक्ष बिष्णोई ३१, अर्णव शेलार १८, देवांग कोळी ५५, कार्तिक छाजेर खेळात आहे ९५; ईशान विचारे ३३ धावांत २ बळी) वि. गावस्कर संघ.


