सिंधुदुर्ग आरोग्य समितीच्या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा गाजला

0
37
सिंधुदुर्ग आरोग्य समितीच्या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा गाजला
सिंधुदुर्ग आरोग्य समितीच्या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा गाजला

सिंधुदुर्ग आरोग्य समितीच्या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा गाजला

विविध आरोग्य प्रश्नांवर चर्चा

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्गजिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार, आरोग्य सुविधांची स्थिती आणि जिल्ह्यातील विविध आरोग्यविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
नेरूर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच समितीच्या बैठकीत सहभागी झालेल्या पावसकर यांनी जिल्हा रुग्णालयातील चालक व सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर यांनी हजेरीपत्रके वेळेवर पाठविली जात असली तरी संबंधित कंत्राटी एजन्सीकडून बिले उशिरा सादर होत असल्याने वेतन वितरणात अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर समितीच्या सभापतींनी संबंधित एजन्सीविरोधात आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत जिल्हा रुग्णालय परिसरातील ‘आयुष’ इमारतीतील गळतीचा मुद्दाही चर्चेत आला. इमारतीतील त्रुटी दूर करूनच ती प्रशासनाने ताब्यात घ्यावी, अशी भूमिका पावसकर यांनी मांडली. सभापतींनीही या मागणीशी सहमती दर्शवत तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश दिले.
दुर्धर आजारग्रस्तांना दिली जाणारी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत अपुरी असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. तसेच रेडी, आचरा आणि आंबोली येथे नवीन पंचकर्म केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मोकळ्या जागांवर वाणिज्य गाळे उभारून महसूल वाढविण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे १७ ठिकाणी अशी सुविधा विकसित करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, नेरूर व कुणकेश्वर उपकेंद्रांची रखडलेली कामे याबाबतही चर्चा झाली. संबंधित विषयांवर विशेष बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या ‘जन आरोग्य समिती’ची माहिती देण्यात आली. मान्सून काळात बाहेरील भागांतून येणाऱ्या गरोदर महिलांवर विशेष लक्ष ठेवण्यासह साथीच्या रोगांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रशासकीय आणि विकासात्मक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

📍 अधिक बातम्यांसाठी भेट द्या :
सिंधुदुर्ग समाचार
🌐 www.sindhudurgsamachar.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here