सिंधुदुर्ग मतदार मॅपिंगमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; ९१ टक्के काम पूर्ण

0
31
सिंधुदुर्ग मतदार मॅपिंगमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; ९१ टक्के काम पूर्ण
सिंधुदुर्ग मतदार मॅपिंगमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; ९१ टक्के काम पूर्ण

सिंधुदुर्ग मतदार मॅपिंगमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; ९१ टक्के काम पूर्ण

ओरोस | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (SIR-2026) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याने मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तब्बल ९१ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.
विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज असून, मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील मॅपिंगची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः मोहिमेचा आढावा घेत कामाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांनी तांत्रिक अडचणी दूर करण्याबरोबरच माहिती संकलनातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मॅपिंग प्रक्रियेत अचूकता राखण्यावर भर देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि निवडणूक यंत्रणेच्या समन्वित प्रयत्नांमुळे अल्पावधीतच ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्यात यश आले. या मोहिमेत विद्यमान मतदार यादीतील प्रत्येक मतदाराचे नाव सन २००२ मधील मतदार यादीशी जोडण्याचे काम केले जात आहे. यामुळे मतदार नोंदींची खातरजमा होऊन मतदार यादी अधिक स्वच्छ आणि विश्वासार्ह होणार आहे.
कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांनी मोहिमेवर काटेकोर नियंत्रण ठेवले. याशिवाय कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग येथील तहसीलदारांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून कामाला गती दिली.
विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या पुढील टप्प्यातही जिल्हा प्रशासनाने वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here