शिरोडा-केरवाडी समुद्र दुर्घटना : बेपत्ता मच्छीमार राजन सारंग यांचा मृतदेह ४८ तासांनंतर सापडला
शिरोडा-केरवाडी समुद्र दुर्घटना : बेपत्ता मच्छीमार राजन सारंग यांचा मृतदेह ४८ तासांनंतर सापडला
वेंगुर्ले | प्रतिनिधी
शिरोडा-केरवाडी समुद्र परिसरात मच्छीमारीसाठी गेलेल्या आणि समुद्रात बेपत्ता झालेल्या राजन राघोबा सारंग (वय ४६) यांचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर वायंगणी समुद्रकिनारी तरंगताना आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे केरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ‘श्री देवी पावणाई प्रसन्न’ या होडीतून प्रकाश राघोबा सारंग (५४), राघोबा उर्फ दाजी प्रकाश सारंग (२१) आणि राजन सारंग हे तिघेजण मच्छीमारीसाठी समुद्रात गेले होते. सकाळी सुमारे पाच वाजता जाळे टाकत असताना अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. प्रचंड लाटांमुळे होडी पलटी झाली आणि तिघेही समुद्रात फेकले गेले.
या संकटाच्या क्षणी राघोबा उर्फ दाजी सारंग यांनी धैर्य दाखवत २५ लिटर क्षमतेच्या प्लास्टिक इंधन टाकीचा आधार घेत तिघांनाही तरंगत राहण्यास मदत केली. काही वेळाने प्रकाश सारंगही पाण्यावर येऊन त्याच टाकीचा आधार घेत राहिले. दाजी यांनी मदतीसाठी आरडाओरडा करत कपड्याच्या साहाय्याने इशारे दिले.
दरम्यान, जवळच मच्छीमारी करत असलेल्या अनिल मसुरकर यांनी प्रसंगावधान राखत आपली होडी घटनास्थळी वळवली. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रकाश आणि राघोबा यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र राजन सारंग यांचा काहीच मागमूस लागला नाही.
घटनेनंतर स्थानिक मच्छीमार, सागर सुरक्षा रक्षक, कोतवाल, पोलीस पाटील, कोस्टल पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू ठेवली. अखेर मंगळवारी पहाटे वायंगणी समुद्रकिनारी राजन सारंग यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह किनाऱ्यावर आणून पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
राजन सारंग यांच्या निधनामुळे केरवाडी आणि परिसरातील मच्छीमार समाजावर शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.