कोकणातील ओस पडणाऱ्या गावांचा गंभीर प्रश्न !

0
128
कोकणातील ओस पडणाऱ्या गावांचा गंभीर प्रश्न !
कोकणातील ओस पडणाऱ्या गावांचा गंभीर प्रश्न !

कोकणातील ओस पडणाऱ्या गावांचा गंभीर प्रश्न !

विश्वनाथ पंडित

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरवागार निसर्ग, डोंगर-दऱ्या, सुपीक जमीन, नारळ-आंब्याच्या बागा आणि श्रमशील माणसं. पण ते आता स्वप्नवत ठरतंय. पण आज या निसर्गसंपन्न भूमीसमोर एक गंभीर सामाजिक आणि आर्थिक संकट उभं ठाकतांना दिसते आहे. रोजगाराच्या अपुऱ्या संधी, पाण्याची कमतरता, निसर्गाचा बदलता मूड आणि हाताला पुरेसं काम नसल्यामुळे कोकणातील उरलीसुरली युवा पिढी मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे आणि इतर शहरी भागांकडे रोजगारासाठी स्थलांतरित आहे. याचा परिणाम म्हणून गावागावातील शेतजमिनी ओस पडत आहेत, वाडे-खुराडी रिकामी होत आहेत आणि ग्रामीण जीवनाचा आत्माच हरवत चालला आहे असं म्हटल्यास वावगं होणार नाही.
एकेकाळी कोकणातील प्रत्येक घरात गुरंढोरं, कोंबड्या, शेतीपूरक व्यवसाय यांची चैतन्यपूर्ण संस्कृती, गरिबीतही शुभेच्छा दिसायची. शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नव्हती, तर ती जीवनपद्धती होती. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. शेतीत उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे तरुण शेतीपासून दूर जात आहेत. पशुधन आणि पक्षीधन यांची संख्या घटत चालली असून अनेक खुराडी आणि गोठे कायमचे बंद पडत आहेत.
कोकणातील डोंगर उजाड होत चालले आहेत. शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचाही ऱ्हास होत आहे. गावातील शाळा ओस पडत आहेत, वृद्ध आणि काही मोजकी माणसं एवढंच गावांमध्ये चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. ही केवळ आर्थिक समस्या नसून सामाजिक आणि सांस्कृतिक विस्कळीततेचीही धोक्याची घंटा आहे. हीच जर परिस्थिती होत राहिली तर दुर्दैवाने निसर्गरम्य, सुंदर कोकणाचे वर्णन इतिहासाच्या पानातच वाचावे लागेल?
या पार्श्वभूमीवर शासन, तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि समाजाने एकत्रितपणे गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीपूरक उद्योग, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. पाणीसाठा वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या प्रभावी योजना राबविणे, तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देणे आणि शेती आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे ही काळाची गरज आहेच.
कोकणातील तरुणाई गावात टिकली तरच गाव टिकेल आणि गाव टिकले तरच कोकणाची ओळख टिकून राहील. अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य नियोजन, प्रामाणिक अंमलबजावणी, लोकप्रतिनिधी आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून कोकण पुन्हा समृद्ध होऊ शकतो. हाताला काम आणि गावाला विकास मिळाला तरच ओस पडणाऱ्या कोकणाला नवसंजीवनी मिळेल. अजून वेळ गेलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here