सावंतवाडी स्टेशनचं नामांतर; विकासाच्या नावावर पुन्हा फलकबाजी?
सावंतवाडी स्टेशनचं नामांतर; विकासाच्या नावावर पुन्हा फलकबाजी?
मुंबई | प्रतिनिधी
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे कोकणात चर्चेला उधाण आले आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय मधु दंडवते यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त होत असतानाच, स्थानकाचं नाव बदलून नेमकं काय साध्य होणार? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोकण रेल्वेच्या उभारणीत मधु दंडवते यांचे योगदान महत्त्वाचे असल्याबद्दल दुमत नाही. मात्र, त्यांच्या नावाचा सन्मान करण्यासाठी सावंतवाडीसारख्या ऐतिहासिक शहराच्या स्थानकाचे नाव बदलणे कितपत योग्य, यावर मतभेद निर्माण झाले आहेत. सावंतवाडी ही केवळ रेल्वे स्टेशनची ओळख नसून कोकणच्या इतिहासाशी जोडलेली अस्मिता आहे. तीच ओळख पुसून नव्या नावाचा फलक लावण्यामागे विकासापेक्षा राजकारण अधिक दिसत असल्याची टीका होत आहे.
स्थानिकांमध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत आहे—लोकमान्य ही उपाधी नेमकी का जोडली? मधु दंडवते यांच्या नावाचा सन्मान असावा, पण लोकमान्य या विशेषणामुळे नाव अधिक लांब आणि व्यवहारात अवघड होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांच्या वापरात पुढे हे नाव LMD टर्मिनस अशा संक्षिप्त रूपात ओळखले जाईल आणि सावंतवाडीही हरवेल, दंडवतेही हरवतील, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नामांतराच्या निर्णयापेक्षा स्थानकाच्या सुविधा आणि रेल्वे सेवांचा विस्तार ही खरी गरज असल्याचा सूर अधिक ठळकपणे उमटत आहे. सावंतवाडी स्थानकातून अधिक गाड्या सुरू करणे, थांबे वाढवणे, स्थानकाचे आधुनिकीकरण करणे, पर्यटनाला चालना देणाऱ्या सेवा उपलब्ध करणे आणि स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देणे या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
स्टेशनचं नाव बदललं म्हणून गाड्या वाढणार आहेत का? प्रवाशांच्या सुविधा सुधारणार आहेत का? रोजगार मिळणार आहेत का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. अनेकांच्या मते कोकणात विकासाच्या नावाखाली घोषणांची रेलचेल असते; मात्र प्रत्यक्ष काम कमी आणि नामांतराचे उपक्रम अधिक दिसतात.
कोकणासाठी मोठे प्रकल्प, पर्यटनवाढ, समुद्री विकास, काच पूल, बंदर अशा घोषणा वारंवार होतात; पण सामान्य नागरिकांच्या रोजच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही. रेल्वे तिकीटांची गैरसोय, अपुऱ्या गाड्या, गर्दी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. अशा वेळी नावबदलाला प्राधान्य दिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
स्व. मधु दंडवते यांच्या कार्याचा गौरव व्हावाच; पण त्यासाठी स्मारक, संशोधन केंद्र किंवा स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा पर्याय असू शकतो, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र सावंतवाडीसारख्या शहराची मूळ ओळख बदलून सन्मान करण्याची पद्धत स्थानिकांना रुचत नसल्याचे दिसते.
एकीकडे फलक बदलण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोकणातील नागरिकांचा सवाल कायम आहे. नाव बदलणार की सावंतवाडीचं भवितव्य?