रायगड किल्ला विकासकामांचा संयुक्त स्थळ पाहणीद्वारे आढावा घ्या - मंत्री ॲड. आशिष शेलार
रायगड किल्ला विकासकामांचा संयुक्त स्थळ पाहणीद्वारे आढावा घ्या – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई — रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, किल्ल्याचे जतन व संवर्धन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या जतन, संवर्धन आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी शिरकाई मंदिर, महादरवाजा आणि वाघ दरवाज्याच्या संवर्धनाची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच ऐतिहासिक राणी वसाहतीचे संवर्धन आणि पुनरुज्जीवनाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत हत्ती तलाव आणि फुटका तलाव परिसरातील गाळ काढणे, जलसाठ्यांची दुरुस्ती तसेच गळती रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता, त्यांची नियमित देखभाल आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेता विकासकामांची गुणवत्ता, वारसा संवर्धन आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा यांचा समन्वय साधण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीला रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, महेश वाव्हळ, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे तसेच रायगड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्त्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रायगड किल्ल्याच्या जतन-संवर्धनाबरोबरच पर्यटकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.