मुक्ता साळवे शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
११ वी व आयटीआय विद्यार्थिनींनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात निवास व्यवस्था, भोजन, दरमहा १,५०० रुपये निर्वाह भत्ता, स्टेशनरीसाठी आर्थिक मदत, ग्रंथालय सुविधा तसेच दैनिक वर्तमानपत्रे अशा विविध सोयी-सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून प्रवेश अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थिनींनी अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करावा.
या वसतिगृहात इयत्ता ११ वी तसेच आयटीआय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थिनींना किमान ५५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे.
वसतिगृहाचा पत्ता :
मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,
डी-१०, पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी,
सर्वोदय नगर, मुलुंड, मुंबई – ४०००८०.
पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशाची संधी साधून विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.