वाई येथे प्रथमच लघुकुंभ मेळाव्याचा भव्य सोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती

0
49
वाई येथे प्रथमच लघुकुंभ मेळाव्याचा भव्य सोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती
वाई येथे प्रथमच लघुकुंभ मेळाव्याचा भव्य सोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती

वाई येथे प्रथमच लघुकुंभ मेळाव्याचा भव्य सोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती

जेजुरी I विजयकुमार हरिश्चंद्रे
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वाई नगरीत कृष्णा नदीच्या विस्तीर्ण तीरावर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लघुकुंभ मेळाव्याचा समारोप भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भव्य शोभायात्रा, शाही स्नान, साधुसंतांचे दर्शन आणि कृष्णामाईची महाआरती हे या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
मेळाव्याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विविध साधुसंतांच्या उपस्थितीत झाले. दिवसभर वाई शहरात धार्मिक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. भगवे वस्त्र परिधान केलेले साधुसंत, नागा संन्यासी आणि देशभरातून आलेल्या महंतांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शहराला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते.
नगराध्यक्ष अनिल सावंत व आयोजकांच्या हस्ते कृष्णामाईची विधिवत पूजा करण्यात आली. हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. सायंकाळी सात वाजता झालेली कृष्णामाईची भव्य महाआरती मेळाव्याचा मुख्य आकर्षणबिंदू ठरली. शंखनाद, मंत्रोच्चार आणि दीपप्रज्वलनाने कृष्णा घाट परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
महाआरतीनंतर देशभरातून आलेल्या साधुसंत, महंत आणि नागा संन्याशांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. समारोपाच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत घोडे, रथ आणि पारंपरिक वेशभूषेतील साधुसंतांचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या शाही स्नानाने भाविकांना कुंभमेळ्याचा अनोखा अनुभव दिला.
गुजरातचे योगेंद्रगिरी महाराज, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन गाडगे, मंदिर महासंघाचे तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, कृष्णा नदी सेवा समितीचे सदस्य तसेच विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणावरील गर्दी लक्षात घेऊन लघुकुंभ मेळा सेवा समिती व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला.
यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमामी गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वाई परिसरात ‘नमामी कृष्णा’ प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान, वाई शहरातील ऐतिहासिक ढोल्या गणपती मंदिर आणि काशी विश्वेश्वर मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशामुळे या लघुकुंभ मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. वाईची ओळख देशपातळीवर अधिक ठळक करण्यासाठी अशा स्वरूपाचे लघुकुंभ मेळावे दर तीन वर्षांनी आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळ्यामुळे वाई नगरीला नव्या आध्यात्मिक पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here