अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक

0
51
अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक
अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा; नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर अन्याय नको – वैभव नाईक

कणकवली — कणकवली नगरपंचायतीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ नरडवे रोडवरील स्टॉलधारकांवर कारवाई करून अन्याय करू नये, अतिक्रमणे हटवायची असतील तर शहरातील सर्व अतिक्रमणांवर समान निकषांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटलपर्यंत असलेले स्टॉल आणि दुकाने हटविण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी नगरपंचायतीने ध्वनिक्षेपकाद्वारे केली होती. यानंतर वैभव नाईक यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेत या निर्णयाबाबत जाब विचारला.
यावेळी नरडवे रोडवरील दुकान व स्टॉलधारकही उपस्थित होते. त्यांनी आपली दुकाने व स्टॉल रस्त्यावर नसून फुटपाथच्या बाहेरील बाजूस असल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा होत नसल्याचा दावा केला.
केवळ नरडवे रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची घाई का केली जात आहे, असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला. शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना लेखी नोटिसा देऊन योग्य वेळ द्यावा आणि त्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच कणकवली बाजारपेठेतील अतिक्रमणेही हटविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अतिक्रमणांवरील कारवाई ही सर्वांसाठी समान असली पाहिजे आणि कोणत्याही एका भागातील व्यावसायिकांवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here