राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चा २७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. २६ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करून पक्षाने २७ व्या वर्षात पदार्पण केले.
या प्रसंगी पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील पक्षाचे विद्यमान व माजी खासदार, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेताना, हा प्रवास केवळ एका राजकीय संघटनेचा नसून पुरोगामी विचारांचा वारसा जपत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी केलेल्या संघर्षाचा असल्याचे नमूद करण्यात आले.
ग्रामीण आणि शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी पक्ष सातत्याने कार्यरत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणापासून सामाजिक समता, उद्योगविकास आणि लोकहिताच्या धोरणांपर्यंत पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
‘शरद’रूपी राजकीय विद्यापीठातून अनेक कार्यकर्ते घडले असून, जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढेही कार्य सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी नवचैतन्य आणि नवसंकल्पाचा संदेश देण्यात आला.