देवगड : देवगड तालुक्यातील वाडा परिसरात कृषी विभागाने अवैध खतसाठ्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत खत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक तसेच सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा सेंद्रिय खतसाठा जप्त करण्यात आला असून खतसाठा ठेवण्यासाठी वापरले जाणारे गोदामही सील करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका कृषी विभागाच्या पथकाला संबंधित ठिकाणी अवैध खतसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी वाडा येथील आंबेडकर चौक परिसरात छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान खत वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक आणि सेंद्रिय खताचा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित गोदामाला सील ठोकण्यात आले. या धडक कारवाईमुळे देवगड तालुक्यात खळबळ उडाली असून कृषी विभागाकडून पुढील चौकशी सुरू आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करण्याचे तसेच कोणत्याही संशयास्पद खतसाठ्याची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे