सिएटलमध्ये भारतीय आंब्यांची जादू; ‘मँगो मॅजिक’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिएटलमध्ये भारतीय आंब्यांची जादू; ‘मँगो मॅजिक’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिएटल (अमेरिका) : भारतीय आंब्यांच्या जागतिक प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मँगो मॅजिक : इंडियन मॅंगोज प्रमोशन अँड टेस्टिंग इव्हेंट’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीला अमेरिकेतील सिएटल येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय वाणिज्य दूतावास आणि एपीडा (APEDA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात अमेरिकेतील प्रमुख आयातदार, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या कार्यक्रमात कॉस्टकोसारख्या नामांकित अमेरिकन रिटेल साखळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारतीय फळांचे १०० हून अधिक प्रमुख आयातदार सहभागी झाले होते. यावेळी भारतातील सात उत्कृष्ट आंबा जातींची विशेष चव चाचणी आयोजित करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील हापूस (अल्फान्सो) आणि केसर, आंध्र प्रदेशातील बंगनपल्ली व हिमायत, उत्तर प्रदेशातील लंगडा आणि दसरी, तसेच गुजरातमधील राजापुरी आंब्यांचा समावेश होता.
भारतीय वाणिज्य दूतावासाने जुलै २०२५ पासून सिएटलमध्ये भारतीय आंब्यांच्या प्रचारासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. अमेरिकन ग्राहकांना भारतीय आंब्यांच्या विविध दर्जेदार जाती उपलब्ध करून देण्यासाठी कॉस्टकोसह विविध भागधारकांशी सहकार्य करण्यात आले आहे.
एप्रिल २०२६ मध्ये कॉस्टकोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या उपक्रमाला अधिक गती मिळाली. त्यानंतर महाराष्ट्रातील ‘भगवा’ डाळिंब आणि ‘केसर’ आंबे अमेरिकेतील विविध कॉस्टको स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
मे २०२६ मध्ये कॉस्टकोने सिएटल, लास वेगास, न्यू जर्सी आणि लॉस एंजेलिस परिसरातील अनेक स्टोअर्समध्ये भारतीय केसर आंब्यांचा पहिला साठा विक्रीसाठी ठेवला. विशेष म्हणजे, स्टोअरमध्ये उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत सर्व भारतीय आंब्यांची विक्री झाल्याचे कॉस्टकोच्या प्रतिनिधींनी सांगितले. यावरून अमेरिकन ग्राहकांमध्ये भारतीय आंब्यांबाबत असलेले आकर्षण आणि वाढती मागणी स्पष्ट झाली आहे.
‘मँगो मॅजिक’ कार्यक्रमामुळे भारतातील विविध प्रादेशिक आंबा जातींची गुणवत्ता, चव आणि निर्यात क्षमता अमेरिकेतील व्यापक ग्राहकवर्गासमोर प्रभावीपणे मांडण्यात आली. यावेळी भारतीय आंब्यांपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या विशेष स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.
भारतीय कृषी उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेतील विस्तारासाठी आणि निर्यात वाढीसाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, भारतीय आंब्यांच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेत आणखी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.