एसटी प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड १ ऑगस्टपासून बंधनकारक
एसटी प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड १ ऑगस्टपासून बंधनकारक
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण मोहिमेला वेग आला आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत.
उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी १ ऑगस्टपूर्वी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे एसटी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होणार असून शासनाच्या विविध प्रवासी सवलत योजनांची अंमलबजावणीही अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.