झाराप रेल्वे स्थानकातून हजारो टन ‘खनिज माती’ची वाहतूक
झाराप रेल्वे स्थानकातून हजारो टन ‘खनिज माती’ची वाहतूक; सिंधुदुर्गात मोठ्या खनिज घोटाळ्याचा संशय!
वैभव नाईक, परशुराम उपरकर व जयेंद्र परुळेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; चौकशीचे आदेश
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्थानकातून गेल्या दोन आठवड्यांपासून हजारो टन खनिज सदृश्य मातीची गोव्याच्या वास्को येथे रेल्वेमार्गे वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामागे मोठा खनिज घोटाळा असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि पक्षाचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार सावंतवाडी तालुक्यातील तळवणे आणि कोंडुरा परिसरातून मोठ्या प्रमाणात उत्खनन करून खनिज सदृश्य माती झाराप रेल्वे स्थानकावर आणली जात आहे. दररोज १० ते १२ मालगाड्यांमधून ही माती गोव्याकडे पाठविली जात असून, सुमारे ५०० ते ६०० डंपरद्वारे तिची वाहतूक होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या उत्खननासाठी आवश्यक पर्यावरणीय मंजुरी, जनसुनावणी आणि शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या माध्यमातून शासनाचा दरवर्षी सुमारे २५ कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे यांना संबंधित उत्खनन, वाहतूक परवाने आणि कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
झाराप परिसरातील ग्रामस्थांनीही डंपर वाहतुकीमुळे वाढते प्रदूषण, रस्त्यांवरील धोकादायक परिस्थिती आणि अपघातांच्या भीतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात यापूर्वी खनिज माती चोरीचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे झारापमधून होत असलेली ही वाहतूक नेमकी कोणत्या नियमांनुसार सुरू आहे, याबाबत जनतेतही मोठी उत्सुकता आणि संशय निर्माण झाला आहे.