कणकवली, दि. १५ : राज्यात ‘कृषिमित्र’ भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकरी, युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित जाहिराती, अर्जासाठी शुल्क भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन किंवा संशयास्पद लिंक यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
विशेषतः रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांनी कोणतीही माहिती पडताळणी केल्याशिवाय अर्ज करू नये किंवा आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांना संशयास्पद जाहिराती, संदेश किंवा भरतीसंदर्भातील फसवणुकीचे प्रकार आढळल्यास त्यांनी तात्काळ संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.
राज्य शासनाच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.