वाघबीळचे वळण ठरतेय मृत्यूचा सापळा! ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चुराडा
बांधकाम विभागाच्या अनास्थेवर ग्रामस्थ संतप्त
सावंतवाडी, दि. १५ : शिरोडाहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या वाघबीळ येथील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने रिक्षाचालक आणि प्रवासी यांचे प्राण वाचले असले तरी या घटनेमुळे वाघबीळच्या वळणावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आजगाव-वाघबीळ येथे हा अपघात घडला. दिगंबर शंभा केरकर (रा. आरोदा) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-०७ एएच-१२४६) मधून एक प्रवासी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी सावंतवाडीहून रेडीकडे जाणारा ट्रक (एमएच-०९ जीजे-९७४७) भरधाव वेगाने येत रिक्षावर आदळला. ट्रक चालकाचे नाव एम. डी. सोहेल (रा. झारखंड) असे असल्याचे समजते.
धडक इतकी भीषण होती की रिक्षा रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात रिक्षाचालक दिगंबर केरकर यांना किरकोळ दुखापत झाली, तर रिक्षातील प्रवासी श्री. पेडणेकर जखमी झाले. त्यांना तातडीने शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर यांनी तत्परता दाखवत पोलिसांना कळविले. त्यानंतर शिरोडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल दीपा मठकर, हवालदार प्रसाद कदम, योगेश मांजरेकर तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे मंगल मोखरे आणि कॉन्स्टेबल अनिल जाधव घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघातामुळे काही काळ दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वाघबीळचा वळण ठरत आहे धोक्याचा बिंदू
या अपघातानंतर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाघबीळ येथील वळणावर दाट झाडी वाढल्याने समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नाहीत. याशिवाय रस्त्यालगतची संरक्षक लोखंडी रेलिंग अनेक ठिकाणी तुटलेली असून त्याची दुरुस्तीही झालेली नाही.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. मात्र झाडी हटविणे, संरक्षक रेलिंगची दुरुस्ती करणे आणि इशारा फलक उभारणे यासारख्या मूलभूत उपाययोजनांकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे.
“मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. आज नशिबाने मोठी दुर्घटना टळली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.


