जिल्हा परिषद शाळा म्हणजे समाज घडवण्याचा भक्कम पाया – रुपेश पावसकर; विद्यार्थ्यांचे झाडे देऊन स्वागत
जिल्हा परिषद शाळा म्हणजे समाज घडवण्याचा भक्कम पाया – रुपेश पावसकर; विद्यार्थ्यांचे झाडे देऊन स्वागत
नेरूर, कुडाळ – :
“जिल्हा परिषद शाळेतून मिळणारे शिक्षण हेच मुलांच्या भविष्याचा आणि समाज घडवण्याचा भक्कम पाया आहे,” असे प्रतिपादन नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत त्यांनी शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी रुपेश पावसकर यांनी नेरूर केंद्र शाळा क्रमांक १, कवठी शाळा क्रमांक १, नेरूर सिरसोसवाडी, वालावल पूर्व शाळा तसेच कलेश्वर विद्या मंदिर नेरूर हायस्कूल आदी शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची रोपे भेट देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पावसकर म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक जडणघडणीचे धडेही दिले जातात. याच शाळांमधून घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी होत समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा या समाज घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास जिल्हा परिषद सदस्य म्हणून सर्व शाळांना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नेरूर येथील कार्यक्रमाला केंद्र प्रमुख चव्हाण सर, सरपंच भक्ती घाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गायत्री मेस्त्री, आनंद नेरुरकर, ग्रामपंचायत सदस्या अनुजा नेरुरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
तर कवठी येथील कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश बांदेकर, सरपंच स्वाती करलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीष वाडयेकर, कुणाल बांदेकर, एकनाथ बांदेकर, सिद्धीविनायक कवठकर, संगीता जोशी, लतिका बांदेकर, शेजल बांदेकर तसेच शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी झाडाचे रोप भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ‘शिक्षणासोबत पर्यावरण’ हा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला असून परिसरात त्याचे कौतुक होत आहे.