आडेली बीएसएनएल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांशी गैरवर्तन केल्याचा अधिकाऱ्यावर आरोप

0
29
आडेली बीएसएनएल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांशी गैरवर्तन केल्याचा अधिकाऱ्यावर आरोप
आडेली बीएसएनएल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांशी गैरवर्तन केल्याचा अधिकाऱ्यावर आरोप

आडेली बीएसएनएल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांशी गैरवर्तन केल्याचा अधिकाऱ्यावर आरोप

तीन वर्षांपासून टॉवरचे काम रखडले; ग्रामस्थांमध्ये संताप

सावंतवाडी, दि. १५ : वेंगुर्ला तालुक्यातील आडेली-खुटवळवाडी येथे मंजूर झालेल्या बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात माहिती घेण्यासाठी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात गेलेल्या नागरिकांशी संबंधित अधिकाऱ्यांनी अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आडेली-खुटवळवाडी परिसरात मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या असून विद्यार्थ्यांचे शिक्षण, ऑनलाइन सेवा, बँकिंग व्यवहार तसेच आपत्कालीन संपर्क यावर त्याचा परिणाम होत आहे. टॉवर मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
यासंदर्भात बीएसएनएल अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तसेच माहिती विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, तसेच आडेली येथील बीएसएनएल टॉवरचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, एका बाजूला डिजिटल सेवांचा विस्तार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार केला जात असताना ग्रामीण भागातील अनेक गावे अजूनही दर्जेदार मोबाईल नेटवर्कपासून वंचित असल्याचे वास्तव या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे.
या प्रकरणी बीएसएनएल प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here