सायन रुग्णालयात अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझरची सुविधा उपलब्ध
सायन रुग्णालयात अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझरची सुविधा उपलब्ध
रुग्णांना जलद व अचूक निदानाचा लाभ
मुंबई, दि. १६ : सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दृष्टीने मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (सायन रुग्णालय) येथे अत्याधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत ही अत्याधुनिक यंत्रणा रुग्णालयाला प्रदान करण्यात आली आहे. या सुविधेमुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि विश्वासार्ह निदान सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सायन रुग्णालय हे मुंबईसह राज्यातील विविध भागांतील हजारो रुग्णांना आरोग्यसेवा पुरविणारे महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रक्त तपासण्या होत असल्याने प्रयोगशाळेवर मोठा ताण असतो. नव्याने उपलब्ध झालेल्या या उच्च क्षमतेच्या स्वयंचलित यंत्रणेमुळे तपासणी अहवाल देण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
ही यंत्रणा मोठ्या प्रमाणातील नमुन्यांची जलद प्रक्रिया करण्यास सक्षम असून अधिक अचूक आणि विश्वासार्ह अहवाल देणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या निदान प्रक्रियेला गती मिळून उपचार वेळेत सुरू करणे शक्य होणार आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अशा सुविधांमुळे रुग्णालयांची कार्यक्षमता वाढून रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होईल.