सिंधुदुर्गातील लघु सिंचन योजनांना गती देण्याच्या सूचना
सिंधुदुर्गातील लघु सिंचन योजनांना गती देण्याच्या सूचना
प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंधारण विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध लघु सिंचन योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील प्रस्तावित, सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त तसेच भूसंपादन निधी आवश्यक असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्गातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले तरी अनेक भागांमध्ये नागरिकांना अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. जिल्ह्याची डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्यमान मापदंडांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कणकवली तालुक्यातील शिरवल, कुंभवडे, ऐनारी, वैभववाडी-कुंभवडे आणि करूळ येथील प्रलंबित योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः ७५ ते ८० टक्के कामे पूर्ण झालेल्या योजनांना तातडीने निधी देऊन त्या कार्यान्वित करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
बैठकीत निधीचा पारदर्शक आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याबरोबरच सर्व प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. मंत्री संजय राठोड यांनी सुधारित मापदंडांनुसार कामांना गती देत सिंधुदुर्गातील सर्व जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले.