‘इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक’ स्पर्धेत पेंडूरच्या प्रियाची राज्यात झेप
‘इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक’ स्पर्धेत पेंडूरच्या प्रियाची राज्यात झेप
राज्यात ८ वा क्रमांक; इस्रो दौऱ्यासाठी निवड, कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावातील न्यू इंग्लिश स्कूलची गुणवंत विद्यार्थिनी कु. प्रिया पेंडूरकर हिने ‘इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक’ स्पर्धेत राज्यात ८ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे इस्रोच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी तिची निवड झाली असून संपूर्ण कोकणवासीयांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
विज्ञान क्षेत्रातील आवड, सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर प्रियाने राज्यस्तरीय स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या या यशामुळे पेंडूर गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रियाच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक आणि वैज्ञानिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात मोठी क्षमता असल्याचे प्रियाच्या यशातून अधोरेखित झाल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रियाच्या या यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.