२०० मीटर परिसरात संयुक्त मोहिमेचा सकारात्मक परिणाम
राज्यातील बसस्थानकांच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, बसस्थानकापासून २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत आणि महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या उत्पन्नावर आणि प्रवासी संख्येवर मोठा परिणाम होत होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बसस्थानकांभोवतीच्या २०० मीटर परिसरात विशेष तपास मोहीम राबविण्यात आली आहे.
परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पोलीस विभाग आणि एसटी प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. परिणामी प्रवाशांचा विश्वास पुन्हा एसटी सेवेकडे वाढला असून त्याचे प्रतिबिंब महामंडळाच्या वाढलेल्या उत्पन्नात स्पष्टपणे दिसून येत आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि अधिकृत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत.