असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण व नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणांचा शुभारंभ
असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण व नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणांचा शुभारंभ
सिंधुदुर्ग –
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या दोन राष्ट्रीय सर्वेक्षणांची सुरुवात झाली आहे. हे सर्वेक्षण केंद्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर २०२६ पर्यंत राबविण्यात येतील. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते दि. १७ जून २०२६ रोजी शुभारंभ करण्यात आला.
प्रत्येक सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील ४८ क्षेत्रे निवडण्यात आली असून, स्थानिक पातळीवरील रोजगार, बेरोजगारी, असंघटित उद्योगांची संख्या आणि रोजगार निर्मिती यासारखी महत्त्वाची माहिती गोळा केली जाणार आहे. PLFS ने देशातील रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग आणि स्वयंरोजगार यांसारख्या विषयांवरील अद्ययावत आकडे उपलब्ध करून द्यावेत, तर ASUSE असंघटित क्षेत्रातील उत्पादन, सेवा, रोजगार व उत्पादनक्षमतेचे डेटाचे संकलन करेल.
प्राप्त माहिती राज्य आणि जिल्हास्तरीय विकास आराखडे, धोरणे व कल्याणकारी योजना आखण्यासाठी महत्त्वाची ठरेल. सर्वेक्षणाचे क्षेत्रीय कामकाज आयपीएसवोएस रिसर्च, मुंबई यांच्या माध्यमातून चालवले जाईल. नियुक्त अधिकारी व कर्मचारी घरं व उद्योगस्थळी जाऊन मुलाखतीद्वारे माहिती घेतील. नागरिकांनी व आस्थापनांनी सत्य व अचूक माहिती देऊन या उपक्रमाला सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.