आषाढी वारीची जय्यत तयारी; पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होऊ देऊ नका - मंत्री जयकुमार गोरे
आषाढी वारीची जय्यत तयारी; पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होऊ देऊ नका – मंत्री जयकुमार गोरे
मुंबई : आगामी आषाढी वारी आणि पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित व सुविधायुक्त पार पडावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore ) यांनी दिले. पालखीतील एकाही वारकऱ्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्पष्ट निर्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानभवन येथे आयोजित आषाढी वारी तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar), विभागीय आयुक्त शितल तेली – उगले (Sheetal Teli-Ugale), पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi), सोलापूरचे जिल्हाधिकारी S. Karthikeyan यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सोलापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, अपर आयुक्त, सामान्य प्रशासन तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.
मंत्री गोरे यांनी सांगितले की, पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागाकडून यंदा ७६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येत असून त्या दर्जेदार असाव्यात याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शौचालये, पाणीपुरवठा आणि निवाऱ्यांवर भर
वारीदरम्यान पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, आरोग्य सुविधा आणि मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्याची चोख व्यवस्था ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शौचालये वापरासाठी सोयीस्कर ठिकाणी उभारावीत, त्याठिकाणी पाण्याची उपलब्धता व नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी तसेच चिखल टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी काँक्रीटीकरण करावे, असे मंत्री गोरे यांनी सांगितले.
पालखी मुक्कामस्थळी जर्मन हँगर आणि जलरोधक मंडपांची व्यवस्था करण्यात आली असून वारकऱ्यांच्या निवाऱ्याची उत्तम सोय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कायमस्वरूपी रस्त्यांवर भर
पालखी मार्गाला जोडणारे ग्रामीण रस्ते आणि पालखी तळाकडे जाणाऱ्या मार्गांची केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता सिमेंट काँक्रीटचे टिकाऊ रस्ते तयार करण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे भविष्यात वारंवार दुरुस्तीची गरज भासणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
यंदा ३० लाखांहून अधिक वारकऱ्यांची अपेक्षा
बैठकीत सचिव Dr. Chandrakant Pulkundwar यांनी यंदाच्या आषाढी वारीसाठी सुमारे ३० लाख विठ्ठलभक्त पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे सर्व विभागांनी अधिक दक्षतेने नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पालखी सोहळ्यासाठी भव्य सुविधा
पुणे विभागाच्या सादरीकरणानुसार:
पुणे जिल्ह्यात ३४३ ठिकाणी २८,५०० शौचालये
सातारा जिल्ह्यात ८,००० शौचालये
सोलापूर जिल्ह्यात २११ ठिकाणी २९,५१० शौचालये
पुण्यात २८, साताऱ्यात ७ आणि सोलापुरात २३ जर्मन हँगर
संपूर्ण पालखी मार्गावर २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा
आरोग्य विभागाचे ५,६९८ कर्मचारी
दिंडी प्रमुखांना १० हजार औषध किटचे वितरण
कायदा व सुव्यवस्थेसाठी २१,८२० पोलीस अधिकारी व कर्मचारी
विविध विभागांचे मिळून ५२,७०६ मनुष्यबळ तैनात
पंढरपुरात अत्याधुनिक मोबाईल नेटवर्क
सोलापूर जिल्हाधिकारी S. Karthikeyan यांनी माहिती दिली की, आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात अत्याधुनिक मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या गर्दीतही संपर्क व्यवस्था सुरळीत राहणार आहे.
तसेच पंढरपुरात १० पालख्या, ३८ मुक्कामस्थळे, ४३ विसावे आणि ७ रिंगणांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून ५०० स्नानगृहे, ५ हजार शौचालये, १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन, ४० स्वागत कमानी, मेडिसीन ऑन व्हील्स, बाईक ॲम्ब्युलन्स आणि हिरकणी कक्ष यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.