एकल महिला धोरणासाठी सूचना व अभिप्राय ८२०८५८९१९५ व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन
एकल महिला धोरणासाठी सूचना व अभिप्राय ८२०८५८९१९५ व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन
मुंबई : राज्यातील एकल महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक व्हावे यासाठी राज्यभरातील नागरिकांकडून सूचना आणि अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे (Sharad Kurhade) यांनी यासंदर्भात आवाहन केले असून राज्यातील एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांनी आपल्या सूचना व अभिप्राय ८२०८५८९१९५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील एकल महिलांसमोरील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा विचार करून त्यांच्यासाठी प्रभावी उपाययोजना आखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे धोरण तयार करताना विविध स्तरांवरील अनुभव आणि सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत.
अभिप्राय पाठविताना केवळ मत नोंदविण्याऐवजी संबंधित विषयाची पार्श्वभूमी, सुचविलेली उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेला सुस्पष्ट प्रस्ताव सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्राप्त होणाऱ्या सूचनांचा धोरण निर्मिती प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे विचार करता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक धोरण तयार होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.