बाबू घाडीगांवकर यांचा 'कोकण भूषण' पुरस्काराने गौरव
बाबू घाडीगांवकर यांचा ‘कोकण भूषण’ पुरस्काराने गौरव
दापोली- मुंबई येथून नियमित प्रसिद्ध होणाऱ्या कोकणदीप मासिकाच्या २४व्या वर्धापनदिन समारंभात कोकणातील प्रथितयश साहित्यिक तथा उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले असून याबद्दल बाबू घाडीगांवकर यांचे साहित्यिक वर्तुळातून तसेच शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
कोकणदीप हे मासिक गेल्या २४ वर्षांपासून नियमित प्रसिद्ध होत असून दिलीप शेडगे हे या मासिकाचे संपादक आहेत. कोकणदीप मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त कोकण तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पत्रकारीता, संघटन तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २५ व्यक्तिंना कोकणभूषण तसेच अद्वितीय कार्य केलेल्यांना कोकणदीप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोकणातील प्रथितयश साहित्यिक तथा उपक्रमशील शिक्षक असलेल्या बाबू घाडीगांवकर यांचा त्यांच्या साहित्य, शिक्षण तसेच संघटन क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल मुंबईत दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित भव्य समारंभात कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, शिवसेना दापोली तालुका संपर्क प्रमुख सुधीरभाऊ कदम, ज्येष्ठ कामगार नेते प्रवीण घाग, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी शेडगे, ज्येष्ठ उद्योजक प्रवीण लाड, रणजित जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘कोकणभूषण ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून कोकणदीप मासिकाचा मानाचा राज्यस्तरीय कोकणभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याने बाबू घाडीगांवकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.