आजगावातील श्री वेतोबा मंदिरात ग्रामस्थ, आंदोलक आणि स्थानिक प्रतिनिधींशी संवाद साधताना राणे यांनी पर्यावरणाचा समतोल बिघडविणाऱ्या आणि स्थानिक जनजीवनावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही विनाशकारी प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी देवासमोर नारळ ठेवून मायनिंग होणार नसल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्गच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असले तरी विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प स्वीकारले जाणार नाहीत. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देणारे प्रकल्पच जिल्ह्यात आणले जातील.
आजगाव परिसरातील नागरिकांनी मायनिंग प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविल्यानंतर निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शासन स्थानिकांच्या भावना आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.