मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत संभाव्य दुष्काळस्थिती, शेतकरी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तसेच रखडलेल्या विकासकामांबाबत अधिवेशनात आक्रमक भूमिका मांडण्याबाबत विचारविनिमय झाला.
राज्यातील शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांशी निगडित प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त रणनीती आखली. अधिवेशनादरम्यान सरकारला विविध मुद्द्यांवर जाब विचारण्यासह लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस आ. जयंतराव पाटील, आ. अंबादास दानवे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. सतेज पाटील, आ. अनिल परब, आ. भास्करराव जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर प्रमुख नेते उपस्थित होते.