कुवारबांब येथील नूतनीकरण केलेल्या ‘सिंचन भवन’ इमारतीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
कुवारबांब येथील नूतनीकरण केलेल्या ‘सिंचन भवन’ इमारतीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी, दि. २१ : रत्नागिरी जिल्ह्यातील कुवारबांब येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘सिंचन भवन’ इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुवारबांब येथील नूतनीकरण केलेल्या ‘सिंचन भवन’ इमारतीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “रत्नागिरीच्या प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता आणण्याचा आमचा मानस असून, सिंचन भवन हे केवळ शासकीय कार्यालय नसून जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे,” असे ते म्हणाले.
नूतनीकरणामुळे पाटबंधारे विभागाच्या कामकाजाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले असून सिंचन योजनांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख अधिक कार्यक्षमतेने करता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील जलसंपदा व्यवस्थापन अधिक मजबूत करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, पाणीपुरवठा सभापती निमेश नायर, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, भाजप शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे, महेश (बाबूशेठ) म्हाप, बंड्याशेठ साळवी, स्मितल पावसकर, सर्व नगरसेवक, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी वैभव गारवे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.