साटेली-भेडशी परिसरात सांजाव सणाचा जल्लोष; पारंपरिक संस्कृतीचे दर्शन
साटेली-भेडशी परिसरात सांजाव सणाचा जल्लोष; पारंपरिक संस्कृतीचे दर्शन
दोडामार्ग :
गोवा आणि कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असलेला सांजाव सण साटेली-भेडशी परिसरात बुधवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पावसाळ्याच्या आगमनाचे स्वागत आणि समाजातील ऐक्य जपण्याचा संदेश देणारा हा सण यंदाही जल्लोषात पार पडला.
सकाळपासूनच युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध फुले व पानांपासून तयार केलेले आकर्षक ‘कोपेल’ डोक्यावर परिधान करून युवकांनी पारंपरिक सांजाव गीते गात गावातून फेरफटका मारला. यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी अनेक युवकांनी विहिरी, पाणवठे आणि अन्य जलस्रोतांमध्ये उड्या मारून सणाचा आनंद लुटला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गाण्यांच्या सुरावटीत साजरा झालेल्या या उत्सवात महिला, युवक, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सांजाव सण हा केवळ एक पारंपरिक उत्सव नसून निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करणारा आणि समाजातील बंधुभाव वाढविणारा सण म्हणून ओळखला जातो. गोवा तसेच कोकणातील ख्रिश्चन बांधवांसाठी विशेष महत्त्व असलेला हा सण साटेली-भेडशी परिसरात उत्साह, आनंद आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला.