कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी २०९.१० कोटींची मदत

0
12
कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी २०९.१० कोटींची मदत ; आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा
कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी २०९.१० कोटींची मदत ; आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांसाठी २०९.१० कोटींची मदत

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश ल्याचा दावा

कुडाळ
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली असून, ही मदत आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचा दावा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी केला. ते कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दादा साईल यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अवेळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत इनपुट सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार प्रति हेक्टर २२,५०० रुपये दराने मदत थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या निर्णयाचा लाभ ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना होणार असून, ९२ हजार ३४२.७८ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान या मदतीसाठी पात्र ठरणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यास ९८.४४ कोटी रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यास ७९.०५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
दादा साईल यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी कोकणातील बागायतदारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करत कृषी विभागाचे लक्ष वेधले. त्यानंतर शासनाने तातडीने निर्णय घेत मदतीस मंजुरी दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील तसेच राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले.
पत्रकार परिषदेला दीपक नारकर, काका कुडाळकर, मिलिंद नाईक, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, अरविंद करलकर, रेवती राणे, स्वरूप वाळके, विजय जाधव, सचिन साईल, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here