मालाडमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाशी राज ठाकरे यांचा संवाद
मालाडमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाशी राज ठाकरे यांचा संवाद
“धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवा, मात्र सार्वजनिक गैरसोय टाळा”
मुंबई
मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, हाच काहींचा उद्देश असू शकतो. राजकीय पक्षांकडून कोणाचाही वापर होऊ देऊ नका.”
ते पुढे म्हणाले, “धर्मगुरू सोसायटीमध्ये येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी कार्पेट टाका आणि भेट संपल्यानंतर ते काढून टाका. धर्माचे कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेले नाही.”
राज ठाकरे यांनी जैन मुनी पद्मसागर हे स्वतःच्या घरीही आल्याचा उल्लेख करत, धार्मिक श्रद्धेचा आदर राखला पाहिजे, असे सांगितले. मात्र, “सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारून किंवा इतरांना त्रास होईल असे प्रकार टाळले पाहिजेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मालाड येथील घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांमध्ये सलोखा कायम राहावा आणि कोणत्याही प्रकारचा सामाजिक वाद टाळावा, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.